डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या महिलेला अटक

सोलापूर :- सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. शिरीष
वळसंगकर आत्महत्या प्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका
महिलेला अटक करण्यात आली आहे. डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात
आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणी डॉ. अश्विन
शिरीष वळसंगकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून मनीषा मुसळे उर्फ मनीषा माने या
महिलेस काल रात्रीच अटक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात तिला न्यायालयात हजर केले
जाणार आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
मनीषा मुसळे उर्फ मनीषा माने यांना वेळोवेळी सहकार्य केले जात होते, तरीही मनीषा यांनी डॉ.अश्विन यांच्यावर खोटे आरोप करून धमकीवजा पत्र
पाठवले होते. या त्रासाला कंटाळून अश्विन यांचे वडील डॉ. शिरीष वळसंगकर यांनी
स्वतःच्या राहत्या घरी बेडरूम मधील अटॅच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतःच्या परवाना
असलेल्या पिस्तूल मधून कानशील मध्ये गोळी घालून आत्महत्या केली. या आत्महत्येस
मनीषा या कारणीभूत ठरल्या म्हणून डॉ. अश्विन यांनी काल कायदेशीर तक्रार दिली आहे. सोलापुरातील
सदर बाजार पोलीस ठाण्यात अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषा माने या महिलेस
काल रात्रीच अटक करण्यात आले असून थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार
असल्याची माहिती मिळाली आहे. सदरची महिला ही वारंवार डॉ. शिरीष वळसंगकर यांना मी
जाळून घेऊन आत्महत्या करणार अशी धमकी देत दबाव टाकत होती. याच कारणावरून डॉ.
वळसंगकर यांनी स्वतःच्या पिस्तुलांमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न
झाले असून पुढील पोलीस तपास सुरू आहे. डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील
सुप्रसिद्ध प्रतिष्ठित न्यूरोसर्जन होते. त्यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय आणि
सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्त आर. राजकुमार यांनी या
प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असल्याची माहिती माध्यमांना दिली.