डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: संशयित आरोपी मनीषा मुसळे हिला तीन दिवसाची पोलीस कोठडी

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून या प्रकरणात हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा महेश माने उर्फ मुसळे या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तिला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीचे वकील एडवोकेट प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद केला की, एफ.आय.आर.चे अवलोकन केले असता आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले याबाबत कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही. आरोपाप्रमाणे दिनांक 17/04/2025 रोजी महिला आरोपी मनीषा यांनी डॉक्टर वळसंगकर यांच्या अधिकृत ईमेलवर पत्र पाठवले, त्यामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये तिचे अधिकार कमी केल्याबाबत, तिचा पगार कपात केला जातो, वगैरे त्यामुळे ती आत्महत्या करणार असून त्यामध्ये डॉक्टर वळसंगकर यांचे नाव घेणार आहे अशा आशयाचा मेल पाठवला, तदनंतर दिनांक 18/04/2025 रोजी डॉक्टर वळसंगकर व त्यांच्या पत्नीने आरोपी महिलेस हॉस्पिटल मध्ये बोलावून समजावून सांगितले. त्यावेळी आरोपीने तिची चूक झाल्याचे सांगून माफी मागितली, पत्र फाडून टाकले, तदनंतर सायंकाळी डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केली, डॉक्टरांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली त्यामध्ये नमूद होते की, “ज्या माणसाला मी शिकवून आज A.O. केले आहे आणि चांगला पगार देतो आहे, त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. याचे मला आतीव दुःख आहे आणि म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.” सदर चिट्ठीच्या आधारे आरोपी महिलेला सदर बझार पोलिसांनी अटक केली. तपास अधिकारी लकडे यांनी चिठ्ठी जप्त करावयाची आहे, प्रकरणाचा तपास करावयाचा आहे, ईमेल द्वारे पाठवलेली सदर चिठ्ठी ची प्रत जी महिला आरोपीने फाडली त्याचे तुकडे जप्त करायचे आहेत, घाणेरडे व खोटे आरोप याबाबत तपास करावयाचा आहे असे पोलीस कोठडीची कारणे मांडली. यात आरोपीतर्फे पोलीसांनी मागितलेल्या पोलीस कोठडीचे मागणीस विरोध करून युक्तिवाद करण्यात आला की, “पोलिसांचे कथनानुसार ईमेल द्वारे पाठवलेली चिठ्ठी जप्त केली आहे त्यामुळे ते पोलीस कोठडीचे कारण होऊ शकत नाही, सदर चिठ्ठी फिर्यादी हॉस्पिटलमध्ये फाडली ती फिर्यादी हॉस्पिटल च्या ताब्यात आहे त्यामुळे ते सुद्धा आरोपीच्या पोलीस कस्टडीची कारण होऊ शकणार नाही, पाठवलेला मेल हा टाईप असल्यामुळे आरोपीचे हस्ताक्षर घेण्याची गरज नाही, सदर प्रकरणात वस्तुस्थिति वेगळी आहे ती लपविण्यासाठी खोटी फिर्याद आरोपीविरुद्ध केली आहे” आरोपी व फिर्यादी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. शिल्पा बनसोडे या काम पाहत आहेत