कुत्रा आडवा आला, पायलट घाबरले! सोलापूर विमानतळावर थरारक क्षण

सोलापूर :- सोलापूर विमानतळावर सोमवारी सकाळी एक विचित्र आणि धोकादायक प्रकार घडला. गोव्याहून येणाऱ्या फ्लाय ९१ कंपनीच्या विमानाच्या लँडिंगवेळी अचानक एक कुत्रा रनवेवर धावत आल्याने वैमानिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना सकाळी 8 वाजून ३० मिनिटांनी घडली. विमान पार्किंग क्षेत्रात जात असताना अचानकपणे एक कुत्रा विमानासमोर धावून गेला. कुत्र्याला हटवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही. वैमानिकांनी ही बाब फ्लाय ९१ कंपनीकडे तोंडी तक्रार म्हणून नोंदवली आहे. या प्रकरणाची कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह:

विमानतळाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असून, यामुळे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. या प्रकरणी विमानतळाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांना विचारणा केली असता, “माहिती घेऊन सांगते,” असे उत्तर त्यांनी दिले.

पीओपी छत कोसळले; निकृष्ट दर्जाची कामे?

याशिवाय, दोन दिवसांपूर्वी विमानतळावरील वेटिंग रूममधील पीओपी छताचा काही भाग खाली पडल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून, नूतनीकरणाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता, अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे.

गेल्या 8 महिन्यांपूर्वी 28 कोटी रुपयांच्या खर्चाने विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र कुत्र्यांची घुसखोरी आणि छताचा भाग कोसळल्यामुळे विमानतळ प्रशासनाची विश्वासार्हता आणि सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

निवेदन:

विमानतळावर पक्ष्यांची व कुत्र्यांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.