ऋषभ पंतच्या ‘सॉमरसॉल्ट’ सेलिब्रेशनवर डॉक्टरांचा इशारा – “आवश्यक नाही!”

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ
पंतने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. पंतने पहिल्या
डावात १३४ आणि दुसऱ्या डावात ११८ धावा करत एका कसोटी सामन्यात दोन शतके ठोकणारा
जगातील फक्त दुसरा यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. या आधी झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर याने
अशी कामगिरी केली होती.पहिल्या डावातील शतक साजरे करताना पंतने मैदानात
‘सॉमरसॉल्ट’ करून आनंद व्यक्त केला. मात्र, दुसऱ्या डावानंतर त्यांनी असे
सेलिब्रेशन केले नाही. यामागील कारण आता समोर आले असून डॉक्टरांनी त्याला असा
इशारा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करणारे
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी सांगितले की, “सॉमरसॉल्ट
ही एक परिपूर्ण हालचाल असली तरी ती टाळावी. पंतचा गुडघा आणि कंबर अजूनही कमकुवत
आहेत. अशा हालचालींमुळे पुन्हा दुखापत होऊ शकते.”
डॉ. पारदीवाला यांनी सांगितले की, “एक चुकीचा कोन किंवा खराब लँडिंगसारखी चूक सर्व काही बिघडवू
शकते. त्यामुळे ‘सॉमरसॉल्ट’ सेलिब्रेशन गरजेचे नाही.” डिसेंबर २०२२ मध्ये ऋषभ
पंतला कार अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटले आणि
त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दीर्घ काळापर्यंत तो क्रिकेटपासून दूर
राहिला. डॉ. पारदीवाला म्हणाले, “ऋषभ खूप भाग्यवान आहे की
त्या अपघातातून वाचला. अशा घटनांमध्ये गाडी उलटून आग लागल्यास मृत्यूची शक्यता खूप
जास्त असते.” पंतने आयपीएल २०२५ मध्येही शतक साजरे करताना ‘सॉमरसॉल्ट’ केले होते.
मात्र, डॉक्टरांच्या इशाऱ्यांनंतर त्याने भविष्यात हे
सेलिब्रेशन टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.