तुम्हाला हवे का लांबसडक, काळेभोर केस ?

आपल्याला अनेकांना हे ठाऊक नसतं की, केसांची निगा राखणं हे वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असतं आणि त्यातही केस विंचरण्याचं खूप महत्त्व असतं. केस वारंवार विंचरल्याने केसांमध्ये अडकलेला कचरा तर निघतोच शिवाय एकमेकांना चिकटून जटा होत असल्या तर ते केस मोकळे होण्यास मदत होते.

असे मोकळे केस कोरडे ठेवणं, व्यवस्थित धुणं व वारंवार विंचरणं यामुळे केसांची मुळं स्वच्छ ठेवता येतात. आपण लक्षात घ्यायला हवं की केस वाढणं किंवा लांब होणं हे आपण केसांसाठी कुठलं सौंदर्यप्रसाधन वापरतो यावर अवलंबून नसतं. विंचरण्याने कवटीच्या बाहेरच्या त्वचेला मसाज होऊन केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होऊ शकतो. असा मसाज केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. विपुल केशसंभार हे चांगल्या प्रकृतीचं, तारुण्याचं, जोशाचं लक्षण मानलं जातं. केस कसे असावेत, त्यांचा रंग कसा असावा, ते किती दाट असावेत यातले बरेचसे गुणदोष हे आनुवंशिकतेतून आलेल्या रंगगुणसूत्रांनी आणि जनुकांनी ठरतात. पण, केसांची निर्मिती त्वचेतल्या केसांच्या मुळांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्याकरता तिथल्या पेशींना लागणारा प्राणवायू आणि जीवनावश्यक घटक पुरवले जाणं गरजेचं आहे. यासाठी त्वचेतील रक्तपुरवठा चांगला झाला पाहिजे. चल पद्धतीचा व्यायाम म्हणजे ज्यामध्ये शरीराची हालचाल होऊन नाडीची गती वाढते, तो या दृष्टीने महत्त्वाचा असतो. केसांची स्वच्छता नितांत गरजेची असते. विनाकारण सौंदर्य प्रसाधनांच्या आहारी जाण्याचं टाळणं आणि वारंवार केस विंचरणं, केसांच्या मुळांना मसाज करणं, हे त्यासाठी आवश्यक आहे.