दिव्या देशमुखचा इतिहास: कोनेरू हंपीला पराभूत करत फिडे महिला विश्वचषक जिंकला, ग्रँडमास्टर किताबही पटकावला!

बाटुमी (जॉर्जिया), २९ जुलै २०२५ — भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरावी अशी कामगिरी नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने करत फिडे महिला विश्वचषक जिंकला आणि ग्रँडमास्टर किताबावरही आपले नाव कोरले. विशेष म्हणजे हा विजय तिने अनुभवी व जगप्रसिद्ध खेळाडू कोनेरू हंपीला पराभूत करत मिळवला. या लढतीत केवळ दोन खेळाडू नव्हते, तर दोन पिढ्या आमने-सामने होत्या.38 वर्षीय अनुभवी हंपी आणि महत्त्वाकांक्षी, आक्रमक दिव्या यांच्यात झालेल्या दोन क्लासिकल डावांत बरोबरी झाली. त्यामुळे सामना टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये दिव्याने १.५–०.५ असा विजय मिळवत इतिहास घडवला. दुसऱ्या डावात हंपी वेळेच्या दबावाखाली होती आणि ४०व्या चालीवर केलेल्या चुकांचा फायदा उचलत दिव्याने अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयानंतरच्या भावनिक क्षणात दिव्या थेट आपल्या आईकडे धावली आणि तिला दिलेली मिठी आणि अश्रूंनी भरलेला तो क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. २००२ साली जेव्हा हंपी ग्रँडमास्टर झाली, तेव्हा दिव्या अवघ्या ३ वर्षांची होती. आज त्याच हंपीला हरवून तिने हा किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत दिव्याजवळ एकही GM नॉर्म नव्हता, तरीही तिने थेट विश्वविजेतेपद आणि ग्रँडमास्टर पदक मिळवले. या कामगिरीमुळे दिव्या भारताची ८८ वी ग्रँडमास्टर, आणि हंपी, हरिका द्रोणावल्ली व आर. वैशाली यांच्यानंतर चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे.