तलाक, तलाक, तलाक पत्नीला दिला घटस्फोट पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

सोलापूर, दि.१६- पतीने घरी असताना तीनवेळा तलाक तलाक तलाक असे म्हणून घटस्फोट दिल्याचे सांगून घरातून हाकलून दिल्याची फिर्याद तनजिला अहमदअली पठाण (रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यावरुन विवाहितेच्या पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तनजिला यांच्या फिर्यादीवरून पती अहमदअली पठाण, सासरा लियाकतअली पठाण, सासू अक्तरबानो पठाण, नणंद आयशा शेख, अलमास खान, अनिकुनिसा शेख व अतिकुनिसा अलीम (सर्वजण रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार विवाहानंतर पतीसह सासरच्यांनी काही महिने व्यवस्थित नांदवले, पण त्यानंतर त्यांनी सासुरवास सुरू केला. त्यांनी पहिल्यांदा प्लॉट घ्यायला आई-वडिलांकडून पैसे आण म्हणून छळ सुरू केला. त्यासाठी सतत शिवीगाळ, मारहाण देखील केली. उपाशीपोटी ठेवून तर कधी शिळे अन्न खायला दिले. जानेवारी २०२४ मध्ये आजारी असताना उपचार घेवू न देता घरीच ठेवले. काही दिवसांनी सासूने वडिलांना बोलावून घेतले आणि पतीने मुलगी घेऊन जावा, असे सांगितले. त्याचवेळी पतीने त्यांच्यासमोर तीनवेळा तलाक म्हणून घरातून हाकलून दिले, असेही फिर्यादीत नमूद आहे.