दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास उपरती; कोणत्याही रुग्णाकडून डिपॅाझिट न घेण्याचा निर्णय

पुणे : बाळंतपणासाठी
आलेल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरंगामुळे चौफेर टीका झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर
रुग्णालयास उपरती झाल्याचे दिसून येते. आता कोणत्याही रुग्णाकडून डिपॅाझिट न
घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे जाहीर केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणावरुन
टीकेची झोड उठवली जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर पुण्यातील विविध संघटनांकडून
आंदोलन करण्यात येत आहे. राज्य शासनाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. या
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती गठित केली. यानंतर आता रुग्णालयाकडून
एक पत्रक जारी करण्यात आले असून आजपासून रुग्णाकडून डिपॅाझिट घेतले जाणार नसल्याचा
निर्णय घेतला आहे. कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा
होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या
मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली. महिला
कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व
तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या
नावाला काळे फासले. या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या.
हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या
मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे, असे या पत्रात म्हटले
आहे. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल बैठक झाली. त्यात या
विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला
राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत
आहे यावर आत्मचिंतन करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. या उद्विग्न करणाऱ्या
घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. यापुढे दीनानाथ रुग्णालय
इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो, डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो, लहान
मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेतली
जाणार नसल्याचा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी मिळून घेतला आहे.
यासंबंधीचे पत्र रुग्णालय प्रशासनाने जारी केले आहे. जेव्हा दीनानाथ सुरू झाले,
तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे.
परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे
गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत
रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली, असल्याचे स्पष्टीकरण
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच. परंतु ह्या
निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व
बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असे
देखील या पत्रात म्हटले आहे.