सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने अविरोध; सुनील कळके नवे उपसभापती

सोलापूर: बहुचर्चित सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार दिलीप माने यांची अविरोध निवड झाली आहे. उपसभापतीपदी सुनील कळके यांची निवड झाली आहे. सुनील कळके हे बाजार समितीच्या एकूणच निवडणुकीचे सूत्रधार असलेले अक्कलकोटचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे निकटवर्तीय मानले जातात. नूतन पदाधिकाऱ्यांची औपचारिक घोषणा झाल्यानंतर माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. माने यांच्या होटगी रस्त्यावरील घरासमोर आणि ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या मुख्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.