धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
.jpeg)
बीड: मस्साजोग येथे आज एक आक्रमक आंदोलन पाहायला मिळालं. येथे
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण गावाने आंदोलन केलं, तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे थेट टाकीवर चढले. सरपंच संतोष
देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. या घटनेने सर्वात धक्का
बसला आहे तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना. संतोष देशमुख यांच्या हत्येला
महिना उलटला तरी अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही, या
प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे
संतापलेल्या देशमुख कुटुंबीयांसह संपूर्ण मस्साजोग आज बाहेर पडलं आणि मोठा
जनाक्रोश पाहायला मिळाला. संतोष देशमुख यांचे भाऊ थेट पाण्याच्या टाकीवर चढले आणि
आत्महत्येचा इशारा दिला. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखही
टाकीवर चढली होती. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आणि पोलीस अधिक्षकांनी
समजूत काढल्यानंतर जवळपास दोन तासांनी ते टाकीवरुन खाली उतरले. यावेळी सरपंच संतोष
देशमुख यांची मुलगी वैभवी ही पहिल्यांदा आक्रमक झालेली दिसली. एरवी अत्यंत शांतपणे
न्यायाची मागणी करणारी वैभवी आज पहिल्यांदा चिडलेली दिसली.