ऑनलाइन सेवा असूनही ऑफलाइन गर्दी कायम; अभिलेखापाल, बांधकाम व नगररचना विभागात नागरिकांची सर्वाधिक वर्दळ

सोलापूर : सोलापूर महापालिकेकडून विविध शासकीय सेवा ऑनलाइन स्वरूपात दिल्या जात असतानाही, नागरिकांचा ऑफलाइन विभागांमध्ये होणारा रेटा कायम असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या रजिस्टरमधील नोंदींनुसार दररोज सरासरी ७०० ते ८०० नागरिक विविध कामांसाठी महापालिकेच्या प्रशासकीय विभागात येत असतात. विशेषतः अभिलेखापाल, बांधकाम व नगररचना या विभागांमध्ये नागरिकांची वर्दळ सर्वाधिक असते. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार आणि शेवटी शुक्रवार या दोन दिवसांमध्ये नागरिकांची गर्दी अधिक प्रमाणात वाढते, असेही रजिस्टरच्या नोंदीवरून स्पष्ट होते. महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय विभागात येणाऱ्या नागरिकांची नियमित नोंद ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० या वेळेत कोणत्या नागरिकाने कोणत्या विभागासाठी भेट दिली, याची नोंद घेतली जाते. या नोंदींवरून गेल्या महिन्याभरात नागरिकांचे कामकाज सर्वाधिक या तीन विभागांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीवरून, डिजिटल युगातदेखील नागरिकांचा ऑफलाइन प्रक्रियांवरचा अधिक भर असल्याचे दिसून येते. त्यामुळे ऑनलाइन प्रणाली अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्याची गरज अधोरेखित होते.