वीरतपस्वी आत्मज्योत यात्रेचे प्रस्थान; भक्तांचा प्रचंड उत्साह

सोलापूर: येथील होटगी मठाचे वीरतपस्वी श्री. चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पुण्यआराधना महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या वीर तपस्वी आत्मज्योत यात्रेचे गुरुवारी पहाटे प्रस्थान झाले. काशी ज्ञानपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह होटगी मठाचे उत्तराधिकारी आणि आत्मज्योत यात्रेचे अध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र महास्वामीजी यांच्या प्रमुख सानिध्यात बाळीवेस येथील होटगी ब्रह्मनमठातून आत्मा ज्योत यात्रेस प्रारंभ झाला. पहाटे 5 वाजता काशी जगद्गुरु यांच्यासह इतर महास्वामीजींच्या उपस्थितीमध्ये श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा प्रारंभ झाला. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवानुभव मंगल कार्यालय, मधला मारुती मार्गे ही यात्रा होटगीकडे निघाली. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी पुष्पवृष्टी केली. ठीक- ठिकाणी भाविकांनी आत्मज्योतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. आत्मज्योत यात्रेच्या स्वागताचे कमान ही उभारण्यात आले आहेत. डोक्यावर कुंभ -कलश आणि पंचारती घेऊन महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध पारंपरिक वाद्यपथक, पुरवंत पथके या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील मठात पोहोचल्यानंतर महापूजा होणार आहे. यात्रेत सहभागी झालेल्या सर्व भक्तांसाठी खोटी येते महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.