भाजपसाठी दिल्ली दूर नाही..... एक्झिट पोलमध्ये विजयाचा अंदाज; काँग्रेसवरच राहणार??

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. चुरशीने झालेल्या मतदानात ६२ टक्के लोकांनी हक्क बजावला. या मतदानानंतर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. जाहिर झालेल्या १० पैकी ८ एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दोन पोलमध्ये आप दिल्लीची सत्ता राखेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार दिल्लीत भाजपला 35 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला 32-37 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला कोणताही फायदा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आप पुन्हा दिल्लीवर सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार की भाजप दिल्लीचा किल्ला हलविण्यात यशस्वी ठरणार हे येत्या शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. दिल्ली विधानसभेत बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे २५ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो. मागच्या तीन निवडणुकींत दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय झाला होता. त्याआधी दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसचा मात्र निवडणुकीवर फारसा प्रभाव दिसला नाही. मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५-४० जागा मिळू शकतात, तर आपला ३२ ते ३७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याची शक्यता आहे. पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्ये एनडीएला ५१ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे, तर आपला फक्त १०-१९ जागा मिळतील असे म्हटले आहे. काँग्रेसला खाते उघडता येणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. पीपल्स इनसाईटच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ४० ते ४४ जागा, आपला २५ ते २९ जागा आणि काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याची शक्यता आहे. पी-मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ३९-४९ जागा, आपला २१-३१ जागा आणि काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जेव्हीसीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ३९-४५ जागा, आपला २२-३१ जागा आणि काँग्रेसला ०-२ जागा मिळतील असे म्हटले आहे.