झेडपी शाळांची पटसंख्या घटली; इंग्रजी माध्यमांकडे वाढला कल

सोलापूर, दि.१६- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांची पटसंख्या किमान १० टक्के वाढावी, असे निर्देश सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांना दिले आहेत. इंग्रजी माध्यमांकडे कल वाढल्याने जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होत असून, ती वाढावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा असून, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात त्या शाळांमध्ये एक लाख ८६ हजारांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित होते. पण, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दोन लाखांपर्यंत पोचलेली पटसंख्या तीन वर्षांत १२ हजारांनी कमी झाली. त्यामुळे यंदा सुमारे ७०० शिक्षक अतिरिक्त होत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना सध्याच्या पटसंख्येत १० टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या आठ हजार ९९० शिक्षक कार्यरत आहेत. ७०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत, पण पटसंख्या कमी झाल्याने तेवढेच शिक्षक अतिरिक्त होत असल्याने या भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही शिक्षक मिळणार नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा पट क्षमतेपेक्षा जास्त असल्याची उदाहरणे आहेत. दुसरीकडे १४० पेक्षा जास्त शाळांची पटसंख्या २० देखील नाही, अशीही दुरवस्था आहे. अशा शाळा भविष्यात बंद होऊ नयेत, यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांनी देखील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांना मदत करावी लागणार आहे. आता मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्यावर त्या नवख्या शिक्षकांना नोकरी टिकविण्यासाठी पटसंख्या वाढवावी लागेल, अशीही स्थिती आहे. मे महिन्यात ४३६० शिक्षकांच्या बदल्या सध्या जिल्हा परिषद शाळांवरील चार हजार ३६० शिक्षक बदलीस पात्र आहेत. त्यांची ऑनलाइन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यावर आता कोणाची काही हरकती असतील तर त्या स्वीकारल्या जात आहेत. त्यानंतर मे महिन्यात त्या सर्व शिक्षकांची बदली अन्य शाळांमध्ये होणार आहेत. त्यात बदलीपात्र, बदली अधिकारप्राप्त व अवघड क्षेत्रातील शिक्षक आहेत. तत्पूर्वी, शासन स्तरावरून आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होतील.