तिरुपती मंदिर चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ६ वर

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील प्रख्‍यात तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा ६ वर पोचला आहे. दर्शनासाठीचा विशेष पास घेण्‍यासाठी बुधवारी (दि.८ )प्रचंड गर्दी झाल्‍याने ही दुर्घटना घडली.  या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. वैकुंठव्‍दारात मोफत दर्शन पास घेण्‍यासाठी गर्दी तिरुपती मंदिरात १० ते १२ जानेवारी या कालावधीत भगवान वेंकटेश्वर स्वामींच्या मोफत दर्शनसाठी भाविकांना १,२०,००० टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 या उत्सवादरम्यान भाविक मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशव्दारातून भगवान वेंकटेश्वराची पूजा करू शकतात. दरवर्षी या उत्‍सवासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. त्‍यामुळे विशेष पास देण्‍याची सुविधाक आहे. या वर्षीही भाविकांना १,२०,००० दर्शन पास वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. १० दिवसांच्या या उत्सवासाठी दर्शन टोकन गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून देण्यात येणार होते; परंतु मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने उभारलेल्या काउंटरवर हजारो लोक रात्रीच्या आधी जमले होते. येथे प्रचंड गर्दी झाली होती. एकाच काउंटरवर पाच हजारांहून अधिक भाविकांची झुंबड तिरुपी देवस्‍थान समितीच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, दर्शन पास वितरणासाठी सत्यनारायणपुरम, बैरागीपट्टेडा आणि रामानायडू शाळांमधील ९४ काउंटरवर वितरण व्यवस्था करण्यात आली होती, तसेच विष्णू निवासम, श्रीनिवासम आणि भूदेवी कॉम्प्लेक्स या तीन तीर्थक्षेत्रांमध्येही वितरण व्यवस्था करण्यात आली होती. तिरुपती महानगरपालिका आयुक्त एन मोरुआ यांनी सांगितले की, विष्णू निवासम मंदिराजवळील बैरागीपट्टेडा येथील एमजीएम हायस्कूलमध्ये उभारलेल्या काउंटरवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बुधवारी सकाळपासून सुमारे ४,०००-५,००० लोक काउंटरवर जमले होते. संध्याकाळपर्यंत गर्दी अनियंत्रित झाली आणि धक्काबुक्की आणि हाणामारी सुरू झाली. महिलेला मदत करण्यासाठी गेट उघडण्यात आले... तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी)चे अध्यक्ष बीआर नायडू यांनी माध्‍यमांना सांगितले की, दर्शन पास घेण्‍यासाठी आपलेल्‍या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. तिला मदत करण्यासाठी गेट उघडण्यात आले. त्‍याचवेळी पाससाठीगर्दी एकत्र पुढे सरकली आणि गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी चेंगराचेंगरी झाली. यामध्‍ये सहा भाविकांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक भाविक जखमी झाले. गर्दी टाळण्‍यासाठी उपाययोजना बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी विष्णू निवासम येथे वैकुंठ एकादशीच्या विशेष प्रार्थनेसाठी आज (दि.९) पुन्‍हा दर्शन पास वाटपास सुरुवात झाली. सुरक्षेच्‍या उपाय योजना सुनिश्चित करण्यासाठी भाविकांना एक-एक करून तिकिटे देऊन गर्दीचे व्यवस्थापन केले जात आहे. अधिकाऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या असल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे.