येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द

येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलेली फाशीची शिक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबूबकर मुसलियार यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात नमूद करण्यात आलं की, येमेनची राजधानी सना येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निमिषा प्रिया ही केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील असून ती एक ख्रिश्चन कुटुंबातील आहे. २००८ मध्ये ती नर्स म्हणून येमेनला नोकरीसाठी गेली होती. तेथे तिने तलाल अब्दो महदी नावाच्या स्थानिक नागरिकासोबत क्लिनिक सुरू केलं. परंतु त्यांचे संबंध नंतर बिघडले आणि परिस्थिती अती गंभीर बनली. मीडिया रिपोर्टनुसार, महदीने तिचा पासपोर्ट जप्त केला व तिला त्रास देऊ लागला. २०१७ मध्ये निमिषाने तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण त्या चुकांमुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर निमिषाला अटक करण्यात आली आणि २०१८ मध्ये तिला दोषी ठरवण्यात आलं. २०२० मध्ये येमेन न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली. अनेक मानवाधिकार संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या शिक्षेविरोधात मोहीम सुरू केली. भारताचे ग्रँड मुफ्ती अबूबकर मुसलियार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मध्यस्थीनंतर यावर्षी २०२५ मध्ये येमेन सरकारने शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.