माशांची मरणयात्रा ! जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा; महापालिकेला आदेश

पुणेः मुळा-मुठा नदीपात्रात नाईक बेटाजवळ हजारो माशांच्या मृत्यूच्या घटनेची ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी या माशांच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश या बोर्डाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.डिसेंबर महिना अखेरीस संगमवाडीजवळील नाईक बेट परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळेच मासे मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाज पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. महापालिकेने या गंभीर घटनेची दखल घेत मृत्यू माशांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यात नदीपात्रात पाणी अडविले गेल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन माशांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.आता मात्र अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने या घटनेची दखल घेतली असल्याचे समोर आले आहे. या बोर्डाकडून याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. हजारो माशांचा मृत्यू ही गंभीर घटना आहे. त्यामुळे ज्या कारणांमुळे ही घटना घडली, त्यास जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर करावी आणि या कारवाईबाबत बोर्डाला माहिती कळविण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महापालिका या घटनेप्रकरणी नक्की कोणाला जबाबदार धरून त्यांच्यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

माशांच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण?

महापालिकेच्या दाव्यानुसार नदीपात्रातील पाणी अडविले गेल्याने डबके तयार झाले. त्यामुळे साचलेल्या पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे माशांचा मृत्यू झाला. मात्र, हे पाणी नक्की कोणी अडविले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सद्यः स्थितीला या भागात नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम सुरू आहे. पाणी अडविले जाऊन या माशांचा मृत्यू झाला नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, महापालिकेने या घटनेप्रकरणी कोणावरही जबाबदारी निश्चित केली नसल्याने आता कायदेशीर कारवाई तरी नक्की कोणावर होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.