स्वारगेट प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : स्वारगेट प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाव गावातील एका शेतातील विहिरीजवळून त्याला अटक करण्यात आली. आरोपाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी तांत्रिक वस्तूंचा म्हणजेच ड्रोन आणि डॅाग स्कॅाडचा वापर करून आरोपाचा शोध लावला आहे. त्याच्या शोधासाठी गावातील स्थानिकांनी पोलिसांना मदत केली असल्याची मााहिती मिळत आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती देत भाष्य केले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. आरोपी लपून बसलेला होता. पण पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आरोपीला शोधून काढलं. तसेच लवकरच या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश होईल. या घटनेबाबतची काही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. या घटनेबाबतची काही माहिती आता देणं योग्य नाही, योग्य स्टेजला आल्यानंतर ती माहिती दिली जाईल. मात्र, या घटनेचा घटनाक्रम काय? याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात बोलताना फडणवीस यांनी या प्रकरणातील सर्व गोष्टी समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर बोलणं योग्य होणार असल्याचे सांगितले आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर आरोपीची चौकशी होईल. तसेच काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेल्या आहेत. तसेच काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेल्या आहेत. याची सर्व माहिती एकत्र करून याबाबत बोलणं योग्य राहील, असे फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले. शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही, असे असंवेदनशील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी  केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार संजय राऊत आणि विजय वड्डेटीवार यांनी घेतला. कदम यांनी केलेल्या विधानावर फडणवीस यांनी त्यांना अशा प्रकरणात संवेदनशील राहून बोलावे असा असा सल्ला दिला आहे.