बंदुकीच्या गोळीने घेतला भावजयचा जीव, सांगोल्यातील बिरूदेव पांढरेला जन्मठेप

सोलापूर : सांगोल्यातील उदनवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत भावांवर गोळीबार करून
भावजयचा जीव घेणाऱ्या बिरूदेव नामदेव पांढरेला पंढरपूर न्यायालयाने जन्मठेपेची
शिक्षा ठोठावली आहे. बिरूदेव सैन्यात कार्यरत होता. पहिल्या मुलाच्या बारशाला
सुट्टीवर गावी आलेल्या बिरूदेवने ही थरारक घटना घडवली होती.
घटनेचा तपशील
उदनवाडी (ता. सांगोला) येथील प्रभाकर लक्ष्मण
देशपांडे यांची आठ एकर जमीन आरोपी बिरूदेवला घ्यायची होती. मात्र, चुलत भाऊ दत्तात्रय पांढरे व त्यांचे भाऊ जयवंत आणि अर्जुन यांनी ती जमीन विकत
घेतल्यामुळे त्याच्या मनात राग निर्माण झाला. याच वादातून दोन्ही बाजूंनी सांगोला
कोर्टात दिवाणी दावे दाखल केले होते.
भांडणातून हत्या
१९ जुलै २०१४ रोजी सकाळी दत्तात्रय पांढरे व
त्यांच्या भावजय उज्वला पांढरे शेतात असताना बिरूदेव आणि त्याच्या कुटुंबातील
सदस्यांनी त्यांच्यावर लोखंडी पाईप आणि काठ्यांनी हल्ला केला. या वेळी बिरूदेवने
स्वतःकडील दोन बोअरच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यात दत्तात्रय आणि जयवंत हे
जखमी झाले. मात्र, दुसऱ्या बारने गोळी भरून उज्वला पांढरे यांच्या
दिशेने गोळी झाडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सहा महिन्यांचा शोध आणि अटक
घटनेनंतर बिरूदेव फरार झाला. सहा महिने पोलिस
त्याचा शोध घेत होते. अखेर गावी येऊन उसात लपून बसलेल्या बिरूदेवला पोलिसांनी अटक
केली.
न्यायालयाचा निर्णय
सरकार पक्षातर्फे अॅड. सारंग वांगीकर यांनी अचूक
युक्तिवाद केला. सांगोला पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी
केलेल्या तपासावर न्यायालयाने समाधान व्यक्त करत आरोपी बिरूदेवला जन्मठेपेची
शिक्षा सुनावली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
बंदूक विहिरीत टाकल्याचे बिरूदेवने पोलिसांना
सांगितले होते. तीन दिवस पाणी उपसूनही बंदूक मिळाली नाही. तपासादरम्यान, आरोपीने विहिरीत करंट सोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न
झाले.