बीडच्या छोटे आका ला न्यायालयाचा दणका; वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज बुधवारी  संपली. यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड कोर्टात सुनावणी झाली. यात आता त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने बीडच्या राजकारणात छोटे आका म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न केले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, 9 नोव्हेंबर 2024 रोजीचे केज येथील माणिक चाटे याच्या संपर्क कार्यालयातील सीसीटीव्ही पुरावा समोर आला आहे. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकीचा फोन याच कार्यालयातून करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या सीसीटीव्हीत सुदर्शन घुले, माणिक चाटे, कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड आणि इतर आरोपी एकत्र दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा मोठा पुरावा असल्याचे म्हंटले जात आहे.