कोल्हापूर महापालिका निवडणूक: काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून
उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ४८ उमेदवारांची नावे
घोषित करण्यात आली असून, त्यामध्ये अनेक दिग्गज माजी नगरसेवकांसह
नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत २९ नवीन चेहरे असून
२४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या
अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक पार
पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील
काँग्रेस गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमदार जयंत
आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व माजी आमदार ऋतुराज
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी अंतिम करण्यात आली. या पहिल्या यादीत
विधानसभा निवडणूक लढलेले राजेश भरत लाटकर, माजी उपमहापौर भूपाल
शेटे, संजय मोहिते, मधुकर रामाणे,
दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, तसेच मनसेचे जिल्हा प्रमुख राजू दिंडोर्ले यांच्यासह १६ माजी नगरसेवकांचा समावेश
आहे. महिला प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर देत तीन माजी नगरसेविकांसह एकूण २४
महिलांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमुळे कोल्हापूर
महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, उर्वरित उमेदवारांची पुढील यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत
पक्षाकडून देण्यात आले आहेत.