पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव

औरंगाबाद (बिहार) :
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नक्षलग्रस्त आझाद बिघा गावात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पत्नी रीता देवी हिला पोलिसांनी अटक केली असून, तिचा प्रियकर अरविंद भुईया आणि मामा सुरेश भुईया फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री रीता देवी हिने अरविंदला बोलावून पती सुनेश्वर भुईया (42) याला शेतात नेले. दोघांनी मिळून प्रथम काठीने मारहाण केली व नंतर गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरी आणून साडीच्या सहाय्याने छताला लटकवला, जेणेकरून ही आत्महत्या भासावी, असा कट आखण्यात आला होता. चौकशीदरम्यान रीता देवीने गुन्ह्याची कबुली दिली. तिचे गेल्या अडीच वर्षांपासून अरविंदसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधातून पतीला हटवण्यासाठी तिने प्रियकर व मामासोबत मिळून कट रचला. चार मुलांची आई असलेल्या रीताने कबुली दिल्यानंतर पोलीस अरविंद व सुरेशचा शोध घेत आहेत.

औरंगाबादमधील दुसरी घटना:
ही घटना काही दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका हत्येच्या घटनेसारखीच आहे. दौडनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिक्कू कुमार याला त्याच्या पत्नी पूजा कुमारी व प्रियकर कमलेश यादवने कारने चिरडून ठार केले होते. त्या प्रकरणातील पूजा सुद्धा अटकेत आहे, तर कमलेश फरार आहे. मृत सुनेश्वरच्या पाठीमागे चार मुले आणि एक मुलगी आहेत. त्यातील एका मुलीचे नुकतेच लग्न झाले होते.