नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना ऐतिहासिक सुरुवात
नवी मुंबई : नवी मुंबईच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची नवी मुंबईकर वाट पाहत होते, तो ऐतिहासिक दिवस अखेर उजाडला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून
आज, गुरुवारपासून अधिकृतपणे व्यावसायिक विमान वाहतुकीला
सुरुवात झाली आहे. यामुळे नवी मुंबईचे नाव जागतिक एअर कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर
ठळकपणे उमटणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची पूर्वसंध्या अत्यंत दिमाखदार पद्धतीने
साजरी करण्यात आली. बुधवारी रात्री विमानतळ कार्यान्वित होण्याच्या आनंदात तब्बल १,५१५ ड्रोनच्या साहाय्याने भव्य ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. या
चित्तवेधक शोमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संपूर्ण प्रवास आकाशात
साकारण्यात आला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सिडकोने
दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी या विमानतळावरून १५
विमाने उड्डाण करणार असून, एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स
(येणारी व जाणारी विमाने) होतील. या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज
आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी आणि विमानांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार
आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना सर्वप्रथम सिडकोने मांडली होती.
२०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात
आले. सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर याच वर्षी ऑक्टोबरमध्ये
विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले होते. आजपासून प्रवाशांची प्रत्यक्ष ये-जा सुरू
झाल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या विमानतळामुळे नवी मुंबईसह ठाणे,
रायगड आणि पुणे परिसरातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईपर्यंतचा प्रवासाचा त्रास कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे विमानतळ भविष्यात देशातील प्रमुख हवाई
केंद्रांपैकी एक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.