हैदराबादमध्ये सँडलच्या टाचेतून कोकेनची तस्करी; उद्योजक अभियंता अटकेत, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड

हैदराबाद : शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एलिट ॲक्शन ग्रुप फॉर ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट (ईगल) युनिटने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २५ जणांची ओळख पटली असून, एका उद्योजकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे हे रॅकेट कोकेन सँडलच्या टाचेमध्ये लपवून कुरिअरद्वारे विक्री करत होते. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव सूर्या अन्नामनेनी (वय ३४) असून, तो अभियांत्रिकी आणि एमबीए पदवीधर आहे. तो कोम्पाली येथील ‘मलानाडू किचन रेस्टॉरंट’चा मालक देखील आहे. विशिष्ट गुप्त माहितीवरून ईगलच्या पथकाने सूर्या अन्नामनेनीला त्याच्या रेस्टॉरंटजवळ अडवले आणि कारची झडती घेतली असता, ड्रग्जचा साठा सापडला. त्यात –

  • १० ग्रॅम कोकेन
  • ३.२ ग्रॅम गांजा
  • १.६ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या
    सापडल्या.

पोलिसांनी सांगितले की हे कोकेन दिल्लीहून मारुती कुरिअरद्वारे ‘फातिमा’ नावाने पाठवण्यात आले होते. ते गुलाबी कार्डबोर्ड बॉक्समध्ये पॅक करून, एका महिलेच्या सँडलच्या टाचेमध्ये लपवण्यात आले होते. या तपासात नायजेरियन ड्रग पुरवठादार, तंत्रज्ञ, डॉक्टर, रिअल इस्टेट व्यावसायिक आणि पॉश पब यांचाही सहभाग उघड झाला आहे. ईगल युनिटचे म्हणणे आहे की, "पकड टाळण्यासाठी ड्रग्ज सिंडिकेट अत्याधुनिक पद्धती वापरत आहेत." या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.