मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ; कोरटकर कुठेही असू द्या, अटक होणार म्हणजे होणारच

नागपूर, 16 मार्च 2025 : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अवमान आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, "कोरटकर कुठेही असू द्या, पोलिस त्याला शोधून काढतील आणि अटक करतील." गेल्या काही दिवसांत कोरटकर दुबईला गेल्याची माहिती समोर आली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "कोरटकर दुबईत असो किंवा इतर कुठेही, त्याला अटक होणार म्हणजे होणारच. पोलिस हे निश्चित करतील." कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 17 मार्चपर्यंत अटकेपासून त्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढील सुनावणीनंतर परिस्थिती स्पष्ट होईल. दरम्यान, कोरटकरला तातडीने अटक करण्याची मागणी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून सांगितले की, "कोरटकरला अटक लवकरात लवकर झाली पाहिजे. न्यायालयात जाण्यासाठी वेळ देऊ नका. जर पोलिसांनी उशीर केला, तर शिवरायांचे मावळे शांत बसणार नाहीत. मात्र, आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु प्रशासनानेही योग्य ती पावले उचलली पाहिजेत." या प्रकरणावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. पोलिस प्रशासनावर कोरटकरला अटक करण्यासाठी प्रचंड दबाव आहे.