बीड कारागृहात दोन गटांत हाणामारी, बबन गिते पुन्हा चर्चेत

बीड: सोमवारी बीड जिल्हा कारागृहात
कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्येतील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला जबर मारहाण
झाली. आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही माहिती
माध्यमांना दिली.
मारहाण कोणी केली?
सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड
यांना मारहाण करणारे कैदी हे बबन गितेच्या समर्थकांचे असल्याचे समजते. बबन गिते
परळी तालुक्यातील प्रभावशाली नेता असून, तो सध्या फरार आहे.
मस्साजोग हत्याकांडातील आरोपी तुरुंगात असताना त्यांना बबन गितेच्या समर्थकांनी
मारहाण कशी केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बबन गिते कोण आहे?
बबन गिते हा परळी तालुक्यातील
वंजारी समाजातील प्रभावशाली नेता मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार
गट) समर्थनाने तो परळीतील राजकारणात सक्रिय आहे. धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून
त्याचे नाव पुढे आले होते.
बापू आंधळे खून प्रकरण आणि फरारी
बबन गिते
मरळवाडीचे सरपंच आणि राष्ट्रवादी
(अजित पवार गट) चे नेते बापू आंधळे यांच्या हत्येचा आरोप बबन गितेवर आहे.
दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनंतर बबन गिते फरार झाला. त्याच्यावर गुन्हा दाखल
असूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
फेसबुक पोस्टमुळे संशय वाढला
वाल्मिक कराडला मारहाण झाल्यानंतर
बबन गितेची "अंदर मारना या मरना सबकुछ माफ है" ही फेसबुक पोस्ट व्हायरल
झाली. त्यामुळे या हल्ल्यामागे त्याचा हात असल्याचा संशय वाढला आहे.
कराड आणि गिते यांच्यातील संघर्ष
वाल्मिक कराडने "जोपर्यंत बबन
गितेला संपवणार नाही तोवर पायात चप्पल घालणार नाही" असा प्रण केला होता. तर
बबन गितेनेही "जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवणार नाही तोवर दाढी काढणार
नाही" असे जाहीर केले होते.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर
प्रश्नचिन्ह
बबन गिते तब्बल 9 महिन्यांपासून फरार असूनही सोशल मीडियावर
सक्रिय आहे. तरीही पोलिस त्याला अटक करू शकलेले नाहीत. त्यामुळे बीड पोलिसांच्या
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.