श्रीशैलम मंदिरातील लाडू प्रसादात झुरळ सापडल्याचा दावा; मंदिर प्रशासनाने फेटाळले

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्रीशैलम देवस्थानम मंदिरात रविवारी एका भक्ताने लाडूच्या प्रसादात झुरळ सापडल्याचा दावा केला असून त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सरश्चंद्र के नावाच्या या भाविकाने व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये लाडूच्या मध्यभागी एक मृत किडा स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर त्यांनी तातडीने मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. तक्रार पत्रात त्यांनी म्हटले की, "२९ जून रोजी मी श्रीशैलमला गेलो असताना मला प्रसादम लाडूमध्ये झुरळ आढळले. देवस्थानमचे कर्मचारी निष्काळजीपणा करत आहेत. कृपया ही समस्या सोडवा." मात्र, मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीनिवास राव यांनी या आरोपांना साफ नकार दिला आहे. “लाडू अत्यंत स्वच्छतेने आणि कर्मचाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली बनवले जातात. झुरळ सापडण्याची शक्यता नाही,” असे त्यांनी सांगितले. श्रीनिवास राव यांनी भाविकांना आवाहन केले की, “प्रसादाबद्दल काळजी करू नका, आम्ही स्वच्छतेचा पूर्ण काळजी घेतो.” या व्हिडिओमुळे मंदिर प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले असून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास होण्याची अपेक्षा आहे.