‘चुल’ फेम रॅपरवर गोळीबार – एल्विश यादवचा जवळचा मित्र थोडक्यात बचावला

गुरुग्राम :
देशभर गाजलेल्या चुल’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेल्या प्रसिद्ध रॅपर राहुल फाजिलपुरियावर आज सकाळी गुरुग्राममध्ये गोळीबार झाला. हल्ल्यातून तो थोडक्यात बचावला असून या घटनेमुळे मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
घटना बादशाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर्न पेरिफेरल रोडवर घडली. राहुल फाजिलपुरिया (खरे नाव राहुल यादव) फाजिलपूर या आपल्या गावी जात असताना पांढऱ्या रंगाच्या थार वाहनातून आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत तीन राऊंड गोळीबार केला.

हल्ल्यातून थोडक्यात बचाव
गोळीबार होताच प्रसंगावधान राखत राहुलने तातडीने गाडी वळवून घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट
सध्याच्या घडीला हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होते, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस वाहनातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासत आहेत.

कोण आहे राहुल फाजिलपुरिया?
राहुल फाजिलपुरिया हे नाव चुल’ या सुपरहिट गाण्यामुळे घराघरात पोहोचले. याशिवाय अनेक रॅप साँग, अल्बम तसेच विविध युट्यूब प्रकल्पांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. ते बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवचे जवळचे मित्र आहेत. काही काळापूर्वी त्यांनी जननायक जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूकही लढवली होती. 
घटनेनंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त होत असून पोलिसांकडून लवकरात लवकर आरोपींना पकडण्याची मागणी होत आहे.