सोलापुरात आजपासून 'चित्रवेल' मराठी चित्रपट गीतांचा महोत्सव

सोलापूर, दि. २४- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत उद्या (मंगळवार) पासून हुतात्मा स्मृती मंदिरात 'चित्रवेल' हा तीनदिवसीय मराठी चित्रपट गीतांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमात तीन दिवसात शंभरपेक्षा जास्त गाण्यांचे सादरीकरण आणि मराठी चित्रपटाशी संबंधित रंजक गोष्टी ऐकावयास मिळणार आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून सोलापुरात प्रथमच या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, कार्तिकी गायकवाड, अजित परब, संज्योती जगदाळे, सिध्देश जाधव, संपदा माने, चैतन्य कुलकर्णी, मयूर सुकाळे अशा प्रथितयश गायकांसोबतच दीप्ती भागवत, सीमा देशमुख, विघ्नेश जोशी यांच्या रंजक निवेदनाचा आस्वाद घेता येणार आहे.

मराठी इतिहासातील चित्रपटाच्या रंजक गोष्टी, गाजलेली गाणी आणि शंभर वर्षांचा मराठी चित्रपटाचा घेतलेला आढावा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण मारुती चवरे यां

नी केले आहे.