मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा ; आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणार

आग्रा : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या
कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार
अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी गुरुवारी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले. शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य
देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का ‘ या कार्यक्रमात
मुख्यमंत्री बोलत होते. या अनोख्या महोत्सवाच्याआयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आग्रा येथे महाराजांनी दाखवलेला
स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे
केले. परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची
प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिली, स्वराज्याची
स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते उत्तम प्रशासक, महिलांच्या सन्मानाचे रक्षणकर्ते होते. महाराष्ट्राचे समाजभान महाराजांनी
जागे केले. समाजातील विविध छोट्या घटकांना, बारा बलुतेदार
जातीसमूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले. जे
देव, देश आणि धर्मासाठी निष्ठेने लढल्याने जगात आदर्शवत असे
हिंदवी स्वराज्य उभे राहिले, असेही ते म्हणाले.