छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात सर्व धर्मांचे लोक - अजित पवारांचा संभाजी भिडेंना टोला

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी स्पष्ट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्व धर्म आणि जातींचे लोक होते. ते एक आदर्श आणि सर्वसामान्य रयतेचे राजा होते, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भिडे यांचे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. त्यांच्या या विधानावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा धर्मावरून भेदभाव केला नाही. त्यांच्या स्वराज्यात मुस्लिमांसह सर्व जाती-धर्मांचे लोक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते." सामाजिक तेढ निर्माण नको - पवार अजित पवार यांनी राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत असे सांगितले. "सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात, कोणत्याही नेत्यांनी समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करणे टाळले पाहिजे," असे त्यांनी नमूद केले. इतिहासाचा चुकीचा अर्थ काढू नका संभाजी भिडेंच्या विधानावर टीका करताना पवार म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मीय लोकांचा सन्मान केला. त्यांच्या स्वराज्यात मुस्लिम सरदार, सैनिक आणि प्रशासकीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यामुळे इतिहासाचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होऊ नये," असे ते म्हणाले.