चेन्नईतील सफाई कर्मचाऱ्याचे प्रामाणिकपण: रस्त्यावर सापडलेले ४५ लाखांचे दागिने परत; मुख्यमंत्री स्टालिन यांच्याकडून सन्मान

आजच्या काळात प्रामाणिकपणा उरला आहे का?” असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र चेन्नईतील एका साध्या सफाई कर्मचाऱ्याने आपल्या कृतीतून हा प्रश्न निरर्थक ठरवला आहे. रस्त्यावर सापडलेले तब्बल ४५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत करून सफाई कर्मचारी पद्मा यांनी समाजासमोर इमानदारीचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी स्वतः त्यांना सन्मानित केले आहे.

नेमकं काय घडलं?

चेन्नईच्या गजबजलेल्या टी नगर परिसरात नेहमीप्रमाणे सफाईचे काम करत असताना पद्मा यांना रस्त्याच्या कडेला एक पिशवी आढळली. कुतूहलापोटी त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यांना मोठा धक्का बसला. पिशवीत सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याची बिस्किटे होती. सुमारे ४५ तोळे वजनाचे हे दागिने असून त्यांची बाजारभावानुसार किंमत सुमारे ४५ लाख रुपये होती.

क्षणाचाही विलंब न करता पोलिसांकडे सुपूर्द

इतका मौल्यवान ऐवज सापडूनही पद्मा यांच्या मनात क्षणभरही लोभ आला नाही. कोणाशीही चर्चा न करता त्यांनी थेट पाँडी बाजार पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण ऐवज पोलिसांच्या ताब्यात दिला. तपासाअंती हे दागिने रमेश नावाच्या व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले, ज्यांनी यापूर्वीच दागिने हरवल्याची तक्रार दाखल केली होती. आपले दागिने परत मिळाल्यावर रमेश यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

मुख्यमंत्र्यांकडून गौरव

या उल्लेखनीय प्रामाणिकपणाची दखल घेत मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पद्मा यांना बोलावून सन्मानित केले.
पद्मा यांच्यासारख्या व्यक्ती समाजाची खरी ताकद आहेत,” असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी त्यांना १ लाख रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले.

प्रामाणिकपणाचा कौटुंबिक वारसा

विशेष म्हणजे, प्रामाणिकपणा हा पद्मा यांच्या कुटुंबाचा संस्कार आहे. कोरोना लॉकडाऊन काळात त्यांचे पती सुब्रमणि यांनाही सुमारे दीड लाख रुपये सापडले होते, जे त्यांनीही प्रामाणिकपणे पोलिसांकडे परत केले होते. अत्यंत साधे जीवन जगणाऱ्या या दांपत्याने पैशांपेक्षा इमानदारी मोठी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.