संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा भाजपला मिळाल्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

मुंबई : भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. संग्राम थोपटे यांच्याबरोबरच तीन तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी देखील आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात संग्राम थोपटे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, भाजप पक्षप्रवेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला आहे अशी प्रतिलारीया दिली आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हल्लबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भातला एक काँग्रेसचा नेता मागील चार दिवसापासून फोन करत होता आणि विचारना करत होता की, खरच संग्राम थोपटे येताय का? त्यावर आम्ही म्हटलं, हो खरच थोपटे येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे पतन होण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला लयाला जाणार हा दिवस आहे, असं ते म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, आम्ही जेव्हा संग्राम थोपटे यांना भेटलो तेव्हा त्यांना विचारलं की तुमचं म्हणणं काय आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं मला काही नको, फक्त माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा, असं ते म्हणाले. त्यामुळे संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.