मागासांच्या उन्नतीसाठी चंद्राम गुरुजींचा आयुष्यभर संघर्ष पुतळा अनावरणप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गार

राज्यकर्त्यांकडून कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा न ठेवता मागास समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष केलेले दलितमित्र स्व.चंद्राम चव्हाण गुरूजी आपल्यासाठी नेहमीच आदर्श आहेत. व्यापक समाजहिताची दूरदृष्टी असलेले गुरूजी अनेकांसाठी व्यक्ती नव्हे तर दैवत असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

शनिवारी, नेहरूनगर येथील मागास समाजसेवा मंडळांच्या प्रांगणात समाजसेवक, दलितमित्र आणि शिक्षणमहर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंधारणमंत्री संजय राठोड हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, शिवशरण पाटील बिराजदार, दत्तात्रय सावंत, विजयपूरचे माजी आमदार देवानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी सनदी अधिकारी बी. के. नाईक, निवृत्त न्यायाधीश नामदेव चव्हाण, जुगनू महाराज, समाजसेवक ब्रिजमोहन पोफलिया, शफी इनामदार, बाबूराव राठोड यांच्यासह चंद्राम चव्हाण गुरूजी यांचे कुटुंबिय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 प्रारंभी स्व.चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे सुपुत्र आणि मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. स्व.चंद्राम गुरूजी यांच्या कर्तृत्वाला उजाळा देत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याशी गुरूजींच्या स्नेह संबंधाचाही त्यांनी आढावा घेतला.  

यावेळी शिल्पकार विजय गुजर आणि त्यांच्या कन्या गीतांजली गुजर यांचाही सन्मान करण्यात आला. स्व.चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणार्‍या परिसस्पर्श या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी झाले. जय नायडू लिखित ए=ाल् या पुस्तकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात झाले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार कस्तुरे, रवींद्र चव्हाण, जयवंत हाके, मच्छिंद्रनाथ राठोड, कार्तिक चव्हाण, संजीव ढोपरे, सूर्यकांत रजपूत, सूरज जाधव यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य आणि चव्हाण कुटुंबियांतील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बंजारा समाजासह सर्व समाजातील मान्यवर, मागास समाजसेवा मंडळातील मुख्याद्यापक, शिक्षक, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्राम चव्हाण यांच्या कार्याचा देशपातळीवर ठसा

स्व.चंद्राम चव्हाण गुरूजींनी शिक्षकी पेशेकडे केवळ नोकरी अथवा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिले नाही. तांड्यांवर विखुरलेल्या बंजारा समाजाच्या सर्वंकष विकासासाठी, मागासलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर देशपातळीवर बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी ठसा उमटविल्याचे प्रतिपादन जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी केले. अज्ञान, अंधश्रध्दा आणि व्यसनाधिनतेत गुरफटलेल्या समाजाला गुरूजींनी समृध्दीचा मार्ग दाखविला. आपण त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी कटीबध्द असल्याचा विश्वास मंत्री राठोड यांनी व्यक्त केला.