पंढरपूरमध्ये चैत्री यात्रेचा भक्तिमय सोहळा पार, लाखो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

पंढरपूर:– "माझे जिवींची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी" या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे, अखंड भक्तिभावाने पंढरपूरमध्ये पारंपरिक चैत्री यात्रेचा सोहळा आज संपन्न झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीन लाख भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये हजेरी लावली.

विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा भाविकांच्या उपस्थितीत

चैत्र एकादशीच्या दिवशी पहाटे श्री विठ्ठलाची नित्य पूजा मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते पार पडली, तर रुक्मिणी मातेची पूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी सपत्नीक केली. विठ्ठल दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.

चैत्र वारीचा नाद आणि हरिनामाचा गजर

दिवसभर टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जागर झाला. विविध दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा करून वारी पूर्ण केली. संत नामदेव पायरी, चंद्रभागा नदी, महाद्वार, बसस्थानक परिसरात शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सलगरवस्तीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.

शिस्तबद्ध दर्शन आणि सेवा-सुविधा

मंदिर समितीने थंड पाण्याची सोय, कुलरची व्यवस्था, खिचडी, सरबत व मठ्ठ्याचे वाटप, आरोग्य कक्ष आणि आयसीयू सेवा यांसारख्या अनेक सुविधा भाविकांसाठी उपलब्ध केल्या. एकादशीच्या दिवशी पुरण पोळीचा नैवेद्य विठ्ठलास अर्पण केला गेला.

शंभू महादेव आणि हरिहर भेटीची श्रद्धा

कोकण, मराठवाडा, तसेच कर्नाटक राज्यातून आलेले भाविक पंढरपूर दर्शनास उपस्थित होते. शंभू महादेवाच्या कावडीसह आलेल्या भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून "हरिहराची भेट" या श्रद्धेने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.यात्रेच्या यशस्वी आयोजनात शकुंतलाताई नडगिरे, व माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी आणि सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला.