आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची नियुक्ती भाजपने जाहीर केली आहे. आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील अकरा समित्यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केले आहेत. रावसाहेब दानवे पाटील यांचे चिरंजीव संतोष दानवे पाटील यांच्याकडे सर्वाधिक महत्वाच्या पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे  पालकमंत्री असताना त्यांनी कल्याणशेट्टी यांना सर्वाधिकार दिले होते. कल्याणशेट्टी यांना प्रति पालकमंत्री म्हणून सोलापूरमध्ये ओळखले जात होते. आजही त्यांच्या शब्दाला प्रशासनात मोठे वजन आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या कल्याणशेट्टी यांचे भाजपमधील महत्व या निवडीने अधोरेखित झाले आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर फडणवीस यांनी अनेकदा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. तेलंगण आणि गोवा विधानसभा निवडणुकीतही फडणवीस यांनी कल्याशेट्टी यांच्यावर काही मतदारसंघाची प्रचाराची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती, त्यामुळे फडणवीस यांच्या निकषांवर ते खरे उतरले होते.