युद्ध थांबले: भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी; अमेरिकेच्या मध्यस्थतेला यश

युद्ध थांबले : भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी; अमेरिकेची मध्यस्थी यशस्वी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी (सीजफायर) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांनी जमीन, हवा आणि समुद्रात सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. आज शनिवार  सायंकाळी 5 वाजतापासून ही शस्त्रसंधी लागू झाली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी निवेदनात ही माहिती दिली.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी ट्विटरवर म्हटले, “पाकिस्तान आणि भारताने तात्काळ प्रभावाने शस्त्रसंधी लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानने नेहमीच आपली संप्रभुता आणि प्रादेशिक अखंडता राखत शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केले आहेत.” अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी ट्विटद्वारे सांगितले की, गेल्या ४८ तासांत त्यांनी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहबाज शरीफ, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि असीम मलिक यांच्याशी चर्चा केली. “भारत आणि पाकिस्तानने तात्काळ शस्त्रसंधी आणि तटस्थ ठिकाणी व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांच्या शहाणपणाची आणि शांततेच्या मार्गाची आम्ही प्रशंसा करतो,” असे रुबियो म्हणाले.


    Over the past 48 hours, @VP Vance and I have engaged with senior Indian and Pakistani officials, including Prime Ministers Narendra Modi and Shehbaz Sharif, External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar, Chief of Army Staff Asim Munir, and National Security Advisors Ajit…


    — Secretary Marco Rubio (@SecRubio) May 10, 2025


अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी जाहीर केले की, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीवर सहमत झाले आहेत.

12 मे रोजी नेमकं काय होणार?

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या डीजीएमओंना पाकिस्तानच्या डिजीएमओंचा कॉल आला होता. दुपारी झालेल्या या कॉलमध्ये दोन्ही डिजीओंमध्ये युद्धजन्य स्थिती थांबवण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर 5 वाजेपासून दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झालेली असली तरी अद्याप हा तणाव पूर्णपणे संपलेला नाही. याच कारणामुळे येत्या 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डिजीओंमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे.त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही चर्चा सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध टळू शकते अन्यथा भविष्यात काहीही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.