कार-ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर दोघे गंभीर
.jpeg)
लातूर, दि. १०-
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील वाघाळा पाटी येथे मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला तर घटनास्थळी रक्त-मांसाचा सडा पडला होता. यातील सर्व मयत रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील रहिवासी आहेत.
रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील बालाजी माने, दीपक सावरे, ऋत्विक गायकवाड, फारूक शेख, मुबारक शेख, अजीम शेख हे सहाजण मांजरसुंबा येथे सोमवारी स्वीफ्ट कारने (एम.एच.१४, एल-६७६९) मित्राकडे गेले होते. मंगळवारी सकाळी सहा वाजता गावाकडे परत येताना अंबाजोगाई कारखानानजीक वाघाळा पाटीजवळ कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बालाजी
माने (वय २७), फारूक शेख (वय ३०), दीपक सावरे (वय २८) यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर ऋत्विक गायकवाड हा रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. या अपघातात मुबारक शेख व आजीम शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आमदार रमेश कराड यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णांच्या उपचाराबाबत सूचना केल्या.