आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन चालकाला मारहाण

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार
गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले.
खराब डाळ आणि भात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. गायकवाड यांनी
स्पष्टीकरण देत कॅन्टीनच्या जेवणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत त्यांनी
कॅन्टीन चालकाला जाब विचारला, पण त्याच्याकडे
कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांनी त्याला बेदम मारले. मारहाण केल्याचा मला
कोणताही पच्छाताप नसल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकरणावर
दिली आहे.
यामुळे आता आकाशवाणीच्या
कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या खराब जेवणाचा मुद्दा चर्चेत आहे. कॅन्टीनमध्ये अतिशय
निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तसेच अंडी
१५ दिवस जुनी, नॉन-व्हेज १५-२०
दिवस जुने, भाज्या २-४ दिवस जुन्या असतात. कोणाला अन्नात पाल
सापडते, तर कोणाला उंदीर किंवा दोरी सापडते, असा गंभीर दावा त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येकाची
जेवणाबाबत तक्रार आहे, असे देखील गायकवाड म्हणाले आहेत. नेमकं
काय घडलं? मंगळवारी रात्री १० वाजता आमदार संजय गायकवाड
यांनी जेवण मागवले. पहिला घास घेताच काहीतरी गडबड असल्याचे त्यांना जाणवले.
त्यानंतर त्यांनी याबाबत कॅन्टीन चालकाला जाब विचारला. सर्वांना अन्नाचा वास
घ्यायला सांगितला. तिथे असणाऱ्या सर्वांना ते खराब वाटले, असे
गायकवाड यांनी सांगितले. विषासारखे अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तरीही
त्यांनी ऐकलेच नाही. त्यामुळे त्यांना माझ्या पद्धतीने समजावलं, असे संजय गायकवाड यांनी सांगितले. दरवर्षी सरकारला हजारो तक्रारी येतात.
पण त्या दुर्लक्षित का केल्या जातात, त्याची चौकशी का होत
नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. याची तपासणी व्हायला हवी,
यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही गायकवाड
यांनी केली आहे. मंगळवारी 8 जुलैच्या रात्री आकाशवाणी आमदार
निवासातील कँन्टीमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली
होती. कर्मचाऱ्याला मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल
झाला होता. आमदार संजय गायकवाड यांनी खराब जेवण दिले गेल्याच्या कारणावरून कॅन्टीन
कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या प्रकरानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात
आली आहे. आता या संपूर्ण प्रकराबाबत आमदार संजय गायकड यांची प्रतिक्रिया समोर आली
आहे.