जम्मू काश्मीर विरोधात केवळ ४ धावांवर तंबूत परतला कॅप्‍टन रोहित शर्मा रणजी ट्रॉफीतही 'फेल'!

मुंबई:- भारतीय कसोटी आणि वन-डे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा  याची मैदानावरील अपयशाची मालिका कायम आहे. अंतर राष्ट्रीय नव्हे तर रणजी ट्रॉफी सामन्यातही चमकदार खेळी करण्यात रोहित अपयशी ठरला आहे. तब्‍बल ९ वर्षानंतर रणजी ट्रॉफीतील सामना खेळण्‍यासासाठी मैदानावर उतरलेल्‍या रोहित शर्माने पुन्‍हा एकदा आपल्‍या चाहत्‍यांना निराश केले. दरम्‍यान, जम्मू-काश्मीर विरुद्ध च्या या  सामन्‍यात टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज यशस्‍वी जैस्‍वालही अपयशी ठरला. तो अवघ्‍या तीन धावांवर बाद झाला. अकीब नबीब याने त्‍याला पायचीत केले. संघाचा आज (दि. २३) बीकेसी मैदानावर जम्मू-काश्मीर विरुद्ध सामना सुरू आहे. तब्‍बल ९ वर्षानंतर रोहित शर्मा रणजी ट्रॉफीसाठी मैदानात उतरला. चाहत्‍यांच्‍या नजरा त्‍याच्‍या कामगिरीकडे होत्‍या;पण रोहितच्‍या अपयशाची मालिका कायम रहिली. तो केवळ चार धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज उमर नाजीरने त्‍याला तंबूत धाडले. जम्मू आणि काश्मीर विरुद्धचा हा सामना रोहितसाठी या हंगामातील एकमेव सामना असू शकतो. ताे ६ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह यानंतर हाेणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. मागील काही महिन्‍यांपासून रोहित शर्माची बॅट थंडावलेलीच आहे. त्‍याने एकही मोठी खेळी केलेली नाही. भारतात झालेल्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो फलंदाजीत अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितने ३ कसोटी सामन्यांच्या ५ डावात फक्त ३१ धावा केल्‍या होत्‍या.