अडथळे दूर झाल्यास फेब्रुवारीअखेर दुहेरी जलवाहिनीतून येणार पाणी

सोलापूर:-उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या मार्गातील सर्व अडथळे लवकर दूर झाले तरच फेब्रुवारीअखेर काम पूर्ण होऊन उन्हाळ्यात सोलापूरकरांना पुरेसे पाणी मिळणार आहे. 110 पैकी 105 किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचे काम आता पूर्ण झाले असून टेंभुर्णीनजीक भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकर्‍यांनी रोखून धरलेले काम आता मार्गी लागले आहे. ठिकठिकाणी पोलिसांची मदत घेऊन जलवाहिनी टाकली जात असल्याचे महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून उजनी ते सोलापूर या दरम्यान सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. परंतु मार्गात अनेक ठिकाणी भूसंपादन व शेतकर्‍यांचे अडथळे यामुळे निर्धारित वेळेत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यात अडथळे उभे राहिले. त्यावर मात करीत जलवाहिनी टाकली जात आहे. टेंभुर्णीजवळ काही शेतकर्‍यांनी भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने काम थांबविले होते. भूसंपादन करूनही शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नव्हता. महसूल विभागाकडून त्या शेतकर्‍यांना मोबदला दिला गेल्याने आता काम वेगाने सुरू आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत दोन किलोमीटर अंतरामध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. अनेक ठिकाणी राहिलेले अर्धवट कामही पूर्णत्वास जात आहे. मोहोळजवळ कादे पेट्रोलपंपानजीक तसेच मंद्रूप-मोहोळ महामार्गालगत जलवाहिनी टाकण्यात शेतकर्‍यांनी अडथळा निर्माण केला आहे. महामार्ग विभागाकडून त्यांना योग्य मोबदला मिळाल्या नसल्याची तक्रार आहे. प्रशासनाने शेतकर्‍यांची समजूत काढली. तर येथील कामही लवकर मार्गी लागू शकते. आता पाच किलोमीटर अंतरामध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम राहिले असून सर्व अडथळे दूर झाले तर फेब्रुवारीअखेर काम पूर्ण करून दुहेरी जलवाहिनीतून सोलापूर शहराला पाणी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे चौबे यांनी सांगितले.