बुलढाण्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ थांबला: ३० हजार महिलांमध्ये धाकधूक, कार्यालयात गर्दी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो महिलांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार महिलांचा लाभ गेल्या दोन महिन्यांपासून थांबला असून, योजना कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवेमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धाव घेत चौकशी केली, तर काही ठिकाणी लाभ न मिळाल्याने महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचेही समोर आले आहे.  बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखांहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र प्रशासकीय पडताळणीदरम्यान ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने सुमारे ३० हजार महिलांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. बँक खाते आधारशी लिंक नसणे, आधार तपशीलात तफावत किंवा तांत्रिक अडचणी ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अफवांनी वाढवला तणाव योजना बंद होणार अशा वावड्या पसरल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक महिलांनी आमचा हक्काचा लाभ बंद होणार का?” अशी चिंता व्यक्त करत थेट कार्यालयात जाऊन माहिती घेतली.
ई-केवायसीतील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी, जेणेकरून आमचा लाभ पुन्हा सुरू होईल,” अशी मागणी लाभार्थी महिलांनी केली आहे.

प्रशासनाचा खुलासा

महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की योजना बंद झालेली नाही. केवळ ज्यांच्या कागदपत्रांत किंवा ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी आहेत, त्यांचाच लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. आवश्यक दुरुस्ती पूर्ण होताच रखडलेला लाभ संबंधित महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.