सरकारी योजनेत दलालांचा हस्तक्षेप; मोफत साहित्यसाठी कामगारांकडून पैसे उकळले जातात

शिरूर (जि. पुणे) : शहर आणि तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या
नावाखाली गरजू कामगारांची उघडपणे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या योजनेअंतर्गत गरीब कामगारांना सरकारकडून सुमारे १०,००० रुपयांचे मोफत सुरक्षा साहित्य व
गृहोपयोगी वस्तू वितरित केल्या जातात. मात्र, काही दलालांनी
योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून ५०० रुपये फॉर्म भरण्यासाठी आणि १५०० रुपये
साहित्य मिळवण्यासाठी उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. अबिंका माता मंदिर परिसर,
मुंबई बाजार, शाळा क्र. ५ परिसर, शिवसेवा वखार शेजारील भाग तसेच जुने मार्केट यार्ड आणि ग्रामीण भागांमध्ये
हा प्रकार बिनधास्त सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकरणी
अद्याप कोणत्याही दलालांवर कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप
पसरला आहे. शिरूर पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात
आली नाही. दरम्यान, रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात
राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
"सरकारचा उद्देश गोरगरिबांना मोफत साहित्य देण्याचा असताना दलाल मंडळी
सामान्य लोकांकडून पैसे उकळत आहेत, हे लाजिरवाणं आहे. यावर
तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे," असे सामंत म्हणाले. या
प्रकारामुळे सरकारच्या कल्याणकारी योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असून,
शासनाने विशेष तपास यंत्रणा गठीत करून दोषी दलालांवर फौजदारी गुन्हे
दाखल करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.