चार जिल्ह्यांत पसरलेल्या ‘लग्न फसवणूक रॅकेट’चा पर्दाफाश; नवरी पैसे घेऊन अंबाजोगाईतून फरार

परभणी : लग्न जुळवणे, मुलगी पाहणी, आणि केरवाडीत लग्न—या सर्व टप्प्यांनंतर अखेर अंबाजोगाईजवळील ढाब्यावर क्लायमॅक्स घडला. नवरी आणि तिची मावस बहीण अचानक कारमधून उतरून एका पांढऱ्या कारमध्ये बसल्या आणि काही क्षणांत गायब झाल्या. यामुळे चार जिल्ह्यांत पसरलेल्या ‘लग्न फसवणूक रॅकेट’चा पोल उघड झाला असून पोलिसांसमोर या गुन्हेगारी नेटवर्कचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पुण्यातील स्वारगेट येथे राहणाऱ्या किरण मोरे याचे लग्न जुळविण्यासाठी दोन-तीन वर्षे प्रयत्न सुरू होते. शेजाऱ्याच्या माध्यमातून इचलकरंजीतील वधू-वर सुचक रंजना मोरे आणि जया कान्हेगावकर यांचा संपर्क आला. कोल्हापूरच्या विनायक जाधव याने ‘सरला मधुकर कोलते’ नावाच्या मुलीचे फोटो आणि आधार कार्ड पाठवल्यानंतर मोरे कुटुंबाने स्थळास होकार दिला. यानंतर सांगोला येथील नवनाथ बंडगीरेसमोर ‘सरला’चे नातेवाईक म्हणून नवे पात्र आले. तसेच लातूर येथील रेखा सूर्यवंशी, तौफीक, बेबीजान शेख, बबन काकडे यांसह एकूण अनेक जण या जाळ्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले. मुलगी गरीब असल्याने लग्नाचा खर्च म्हणून १.५ लाख रुपये आणि त्यावर एजंटांना प्रत्येकी १० हजार रुपये लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार मोरे कुटुंबाने २१ हजार रुपये फोनपेवर भरून व्यवहार सुरू केला.

मुलगी पाहणी आणि केरवाडीत लग्न

२ डिसेंबरला कुटुंब तुळजापूर—लातूर—पालममार्गे मुलगी पाहण्यासाठी गेले. मुलगी, तिची आई व मावस बहीण यांच्या उपस्थितीत पाहणी झाली. दुसऱ्या दिवशी केरवाडी (ता. पालम) येथील मारोती मंदिरात साधे लग्न लावण्यात आले. लग्नानंतर नवनाथ बंडगीरे आणि विनायक जाधव यांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार कुटुंबाने २,१०,००० रुपये रोख आणि ८०,000 रुपये Google Pay वर दिले.