शव गुंडाळण्यासाठी २ हजारांची लाच? वाशी रुग्णालयातील संतापजनक प्रकार उघड
.jpeg)
मुंबई:- नवी मुंबईतील वाशी महापालिका रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी २ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही घटना एका २३ वर्षीय आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या आत्महत्येनंतर घडली. मूळची कानपूरची असलेली ही तरुणी नवी मुंबईतील ऐरोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने आत्महत्या केली. तिच्या निधनानंतर तिचे आई-वडील उत्तर प्रदेशहून मुंबईत दाखल झाले. वाशी रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांनी प्रथम १ हजार आणि नंतर २ हजार रुपयांची मागणी केली. "कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो," असे सांगत लाच मागण्यात आली. यासंबंधीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
नातेवाईकांची प्रतिक्रिया:
"मुलीच्या
मृत्यूने आम्ही आधीच खचून गेलो आहोत. त्यात कर्मचाऱ्यांच्या अमानुष वागणुकीने अधिक
दुःख दिलं," अशी भावना मृत तरुणीच्या वडिलांनी व्यक्त केली.
त्यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद:
या प्रकरणामुळे पालिका कर्मचाऱ्यांकडून माणुसकीच्या सीमाच ओलांडल्या जात असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांमध्ये संताप उसळला असून, "शव गुंडाळण्यासाठी लाच" हा शब्दप्रयोगच समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करतो. नवी मुंबई महापालिकेने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.