मुंबईला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिस हाय अलर्टवर

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य सज्ज असताना, मुंबईला पुन्हा एकदा मोठ्या बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. यावेळी धमकी आत्मघातकी बॉम्बस्फोटाची (Suicide Bomb Blast) असून, मुंबई पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर संदेशाद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

धमकीत काय म्हटले आहे?

धमकीच्या संदेशात असे नमूद करण्यात आले आहे की,

  • ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब ठेवले आहेत
  • ४०० किलो आरडीएक्सचा वापर होणार आहे
  • या स्फोटामुळे "१ कोटी लोकांचा मृत्यू होईल" असा दावा करण्यात आला आहे.
    यामध्ये लष्कर-ए-जिहादी’ या संघटनेचा उल्लेख करण्यात आला असून, १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट घोषित केला आहे. संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून, तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.

मुंबईला धमक्या मिळण्याचा इतिहास

मुंबईला याआधीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत—

  • दोन आठवड्यांपूर्वी वरळीतील फोर सीझन्स हॉटेलमध्ये स्फोटाचा इशारा देण्यात आला होता.
  • १४ ऑगस्ट रोजी ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होईल असा फोन आला होता.
  • २६ जुलै रोजी सीएसएमटी स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
    या सर्व तपासांमध्ये काहीही संशयास्पद आढळले नसले तरी यावेळी मिळालेली धमकी अत्यंत गंभीर मानली जात आहे.