180 किमी प्रतितास वेगात BMW; डंपरला भीषण धडक
.jpeg)
मुंबई : शुक्रवारी पहाटे मुंबईतील अटल सेतूवर भीषण अपघात झाला. २८ वर्षीय पुणीत सिंह माजरा या
तरुणाच्या बीएमडब्ल्यू एक्स१ कारने डंपरला जोरदार धडक दिली. १८९ किमी प्रतितास वेगाने चालवलेली ही
कार नियंत्रण सुटल्याने डंपरमध्ये आदळली आणि तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पुणीत
सिंह माजरा हा चेंबूर येथे राहत होता. तो पनवेलच्या
दिशेने जात असताना शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास अटल सेतूवर ही घटना घडली.
त्याने भाड्याने घेतलेली बीएमडब्ल्यू कार रिकाम्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवत
होता. अचानक नियंत्रण सुटल्याने कारने समोरील डंपरला जोरदार धडक दिली. अपघात इतका
भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णतः चुरडला गेला. कार डंपरमध्ये अडकली होती,
आणि केवळ डिक्की उघडता आली. शेवटी डिक्कीतूनच पुणीत सिंह माजराचा
मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी
दाखल झाले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये कारचा वेग १८९ किमी प्रतितास असल्याचे स्पष्ट झाले
आहे. तरुणाच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले गेले असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुणीतचे
वडील रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत असून, अपघातग्रस्त गाडीत
पुणीतचे ओळखपत्र सापडल्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.