ब्लॅक मंडे! शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबवण्याचे नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून सातत्याने बाजारात घसरण दिसून आली आहे. आज सोमवारी  देखील शेअर बाजार घसरणीसह उघडला. सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवातच खराब झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत असून बीएसई सेन्सेक्स ५५० अंकांपेक्षा जास्त घसरला तर निफ्टी २२,६५० अंकांपेक्षा खाली आला. ट्रम्प यांच्या टॅरिफची अजूनही जगभरातील बाजारांना धडकी भरली आहे. सोपमवरी  सकाळी सेन्सेक्स 418 अंकांनी घाली येऊन 74,893 वर, तर निफ्टी 186 अंकांनी घसरून 22,609 वर उघडला. बाजार उघडल्यानंतर यात आणखी घसरण दिसून आली. सकाळी 10 वाजता सेन्सेक्स 729 अंक घसरून 74581 वर पोहोचला आहे. तर, निफ्टीने घसरणीचे दुहेरी शतक गाठले. निफ्टी 228 अंकांनी घसरून 22568 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण एचसीएल टेकमध्ये झाली आहे. कंपनीचा शेअर 3 टक्क्यांनी खाली आला. याशिवाय विप्रो, श्रीराम फाइनन्स, टेक महिंद्रा आणि ट्रेंटमध्येही 2 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्येही पडझड दिसून आली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये, सेन्सेक्स 30 मधील M&M, सन फार्मा, मारुती, बजाज फिनसर्व आणि नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये काहीशी तेजी दिसून आली आहे.