अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड

राज्यातील २९ महापालिकांपैकी अकोला महापालिकेला अखेर महापौर मिळाले असून, भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुका पार पडून १५ दिवस उलटल्यानंतर ही निवड झाली असून, त्यामुळे अकोला महापालिकेचा पहिला महापौर निश्चित झाला आहे. अकोला महापालिकेत सुरुवातीला काँग्रेसने महापौर पदावर दावा केला होता. मात्र आवश्यक बहुमत नसल्याने तो फोल ठरला. ८० जागा असलेल्या या महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपने राजकीय रणनीती आखत ३८ नगरसेवकांसह शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ३, अजित पवार गटाचा १, शिंदे गटाच्या शिवसेनेचा १ आणि २ अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून सत्ता स्थापन केली. महापौर निवड प्रक्रियेदरम्यान एमआयएमचे ३ नगरसेवक तटस्थ राहिले. शारदा खेडकर या अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा ४५ मतांनी पराभव केला होता. महापौर निवडीनंतर अकोला महापालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अकोल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांमध्येही महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे.