बीएमसी' जिंकण्याचा भाजपचा प्लॅन तयार
.jpeg)
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत
महायुतीने मोठा विजय मिळवला. त्यामुळे भाजपचे कॉन्फिडन्स आता चांगलेच वाढले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने तयारी सुरु केल्यानंतर
त्यापाठोपाठ आता भाजपने देखील मैदानात पाऊल टाकले आहे. त्यासाठी मुंबई भाजपची बैठक
पार पडली. या बैठकीत येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली
आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने वेगळी रणनीती आखली आहे.
मुंबई महापालिकेचा पुढील महापौर महायुतीचाच असेल यासाठी
महायुतीने तयारी सुरु केली आहे. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष
नेमणुकीवर कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक होईपर्यंत
भाजप शेलार यांना अध्यक्षपदी ठेवणार का, अशी चर्चा झाली.
२०१७ मध्ये शेलार अध्यक्षपदी असताना त्यांनी महापालिका
निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून दिले होते. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अवध्या
३१ जागा जिंकणाऱ्या भाजपने थेट ८२ जागांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे यावेळेस
भाजपचा महापौर असेल या पद्धतीने तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. भाजपच्या बैठकीत
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. भाजपमध्ये एक व्यक्ती
आणि एक पद असा नियम आहे. आशिष शेलार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
मंत्रिमंडळात स्थान मिळालेले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा
दिला आहे. मंत्रिपद स्वीकारल्याने शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदी कोणाची
वर्णी लागणार याची उत्सुकता होती. पण या बैठकीत अध्यक्षपदाबद्दलचा कोणताही निर्णय
झाला नसल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या
दृष्टीने भाजपकडून १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी
केली जाणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीत मतदानावेळी जसे टेबल लावले जातात, तसे माँक टेबल्स, बूथ, स्टॉल्स
५ जानेवारीला मुंबईत लावण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीवर जास्त भर दिला जाईल,
असे नियोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार
झाली. त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. त्याआधीच्या निवडणुकीत भाजपला २३ जागा
मिळाल्या होत्या. पण लोकसभेनंतर अवध्या ६ महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत
भाजपने तब्बल १३२ जागा जिंकल्या. या कालावधीत तब्बल ४० लाख नव्या मतदारांची नोंदणी
झाली. या निवडणुकीत भाजपला झालेले मतदान पाहता, या नव्या नोंदणीचा सत्ताधाऱ्यांना फायदा
झाला. लोकसभेला महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख १५ हजार ८१९ मते पडली होती. तर
महायुतीला २ कोटी ४८ लाख १२ हजार ६२७ मतदान झाले होते. विधानसभेला मात्र महायुतीला
३ कोटी १८ हजार ४९ हजार ४०५ मते पडली, तर मविआला २ कोटी २७
लाख १० हजार २२० मतदान झाले. मविआची मते २३ लाखांनी कमी झाली असताना महायुतीची मते
७० लाखांनी वाढले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या
मतदार नोंदणीचा फायदा महायुतीला झाला. त्यामुळे आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी
भाजप हाच फॉर्म्युला वापरणार असल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे आगामी काळात होत
असलेल्या महापालिका निवडणुकीकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले आहे.